पुणे ( वास्तव पोस्ट ) : स्वारगेट बसस्थानक आगारात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय रामदास गाडे यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी मध्यरात्री शिरुर तालुक्यातील एका गावातून अटक केली. सुमारे ७० तासांचा शोध मोहीमेनंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.
सापळा रचून ऊसाच्या शेतातून केली अटक
संशयित दत्तात्रय गाडे हा घटनेनंतर फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथके तैनात केली होती. आरोपीस पकडण्यासाठी १०० हून अधिक पोलिसांचे १३ पथकं गावकऱ्यांच्या मदतीने ऊसाच्या शेतात शोधण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचाही वापर करण्यात आला. तसेच आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते.
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये घडली होती घटना
२६ वर्षीय पीडित तरूणी पुण्यात नोकरीला असून, ती फलटण येथे जाण्यासाठी सकाळच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात पोहोचली होती. बस शोधत असताना आरोपी दत्तात्रय गाडेने तिची दिशाभूल करून फलटणला जाणारी बस तिकडे उभी असल्याचे सांगत त्या बसने जायचे सांगितले. ती तरुणी बसमध्ये चढल्यावर तिच्या पाठोपाठ दत्तात्रय गाडे हा देखील बसमध्ये चढला. अंधाऱ्या जागी उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
सदर बलात्कार प्रकरणामुळे पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. राजकीय व्यक्तीं नी देखील सदर घटनेबाबत सरकार तसेच यंत्रणेला धारेवर घेतले. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीस ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, अधिक तपास गुन्हे शाखा करत आहे.
या घटनेतील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३६ वर्षे) याची गुन्हेगारी पार्श्वभुमी असून त्याच्यावर याआधी चोरी, दरोडे आणि चेन स्नॅचिंगसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. २०१९ साली तो एका दरोड्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटला होता. गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे.
