Home » क्रीडा » वानखेडे मैदानावर अभिषेक शर्माची वादळी खेळी ; भारताचा सलग १७ वा मालिका विजय !

वानखेडे मैदानावर अभिषेक शर्माची वादळी खेळी ; भारताचा सलग १७ वा मालिका विजय !

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ५ व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजय मिळविला. टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या आणि ५ व्या T20I सामन्यात भारताने इंग्लंडचा वाईट रीतीने पराभव करून मोठी कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने अभिषेक शर्माच्या झंझावाती शतकाच्या जोरावर २० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावांची मोठी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या ९७ धावांत गडगडला. अशाप्रकारे भारताने इंग्लंडवर १५० धावांनी विजय मिळवला आणि ५ सामन्यांची T20I मालिका ४-१ ने जिंकली. T20I क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत टीम इंडियाचा हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्धचा हा सर्वात मोठा विजय आहे. 

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून अर्शदीप सिंगच्या जागी मोहम्मद शमीचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाची सलामीची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने डावाची सुरुवात शैलीत केली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्या षटकात दोघांनी १८ धावा दिल्या. यात संजूने २ षटकार आणि १चौकार खेचला. मात्र, दुसऱ्याच षटकात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने भारतीय सलामीची जोडी फोडण्यात यश मिळवले. वुडने संजू सॅमसनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सॅमसन केवळ १६ धावा करून बाद झाला. 

यानंतर मात्र अभिषेक शर्माने झंझावाती फलंदाजी सुरू केली, आणि ५व्या षटकात षटकार खेचून आपले अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक झळकावले भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने ५४ चेंडूत १३५ धावांची शानदार खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि १३ षटकार मारले. तर तिलक वर्मा २४, सूर्यकुमार यादव २, शिवम दुबेने १३ चेंडूत ३० धावा, हार्दिक पांड्या९, रिंकू सिंग ९, अक्षर पटेल याने १५ धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून ब्रेडन कार्सने ३ बळी घेतले.

भारताच्या प्रचंड धावसंख्येला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा सलामीवीर फिलीप सॉल्ट वगळता इतर इंग्लिश फलंदाजांनी क्रीझवर फक्त हजेरी लावली. फिलिप सॉल्टने २३ चेंडूत ५५ धावा केल्या. जेकब बेथेलला १० धावा करता आल्या. या दोघांशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही.

भारताने पहिले दोन सामने जिंकून ५ सामन्यांच्या T20I मालिकेत चांगली सुरुवात केली, पण तिसरा सामना जिंकून इंग्लंडने मालिका कायम राखली. यानंतर टीम इंडियाने रोस्कोटमधील चौथा सामना जिंकून मालिका ताब्यात घेतली. शेवटच्या सामन्यातही टीम इंडियाने आपला दबदबा कायम ठेवत ५ सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली. आता ६ फेब्रुवारीपासून नागपुरात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होण्यापूर्वी दोन्ही संघ ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने येतील.

■ २०१९ पासून घरच्या मैदानावर जिंकल्या सलग १७ टी-20 मालिका

भारताने घरच्या मैदानावर २०१८-१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० ने टी-20 मालिका गमावली होती. पण त्यानंतर एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. २०१९ पासून मालिका विजयाची चव चाखत आहे. टीम इंडियाने २०१९ पासून आतापर्यंत सलग १७ टी-20 मालिका जिंकल्या आहेत. भारताच्या आसपास कोणताच संघ नाही. भारताशिवाय कोणत्याच संघाला घरच्या मैदानावर सलग १० मालिका जिंकता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाने २००६ ते २०१० दरम्यान घरच्या मैदानावर ८ टी-20 मालिका जिंकल्या आहेत. दक्षिण अफ्रिकेने २००७ ते २०१० दरम्यान ७ मालिका जिंकल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!