Kolkata Doctor Rape Case : कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी मुख्य आरोपी संजय रॉय यास १० ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याच्या शिक्षेसाठी १६० पानांचा निकाल लिहिण्यात आला होता, आज संजय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
कोलकत्ता ( वास्तव पोस्ट ) : कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याला आज सोमवार दि २० जानेवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच ५० हजार रुपयांचा दंडही त्याला ठोठावण्यात आला आहे.
दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय याला शिक्षेची घोषणा करताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिर्बन दास म्हणाले की, हे दुर्मिळ प्रकरण नाही. त्यामुळे या प्रकरणात ते दोषीला जन्मठेपेची शिक्षा देत आहेत.
शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायाधीशांनी संजय रॉय याला सांगितले की, “या खटल्यातील मी सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासले. युक्तिवादही ऐकले. हे सर्व पाहिल्यावर, मी तुला दोषी ठरवत आहे. तू दोषी आहेस. तुला शिक्षा झालीच पाहिजे,” असे न्यायाधीश अनिर्बान दास यांनी म्हटले होते. दरम्यान, नराधम संजय रॉयने न्यायाधीशांसमोर आपण गुन्हा केला नसल्याचा दावा केला. आरोपी संजय रॉयने न्यायाधीशांसमोर म्हटले की, “मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. मी असा गुन्हा केलेला नाही. ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना सोडून दिले जात आहे.”
संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला पीडितेच्या कुटुंबीयांना १७ लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. यावर पीडितेच्या पालकांनी सांगितले की, त्यांना कोणत्याही प्रकारची भरपाई नको आहे. BNS च्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत संजय रॉय दोषी आढळला आहे. या कलमांतर्गत गुन्हेगाराला जास्तीत जास्त फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. मात्र न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.