MAHA KUMBH MELA : कुंभमेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत मोठी वित्तहानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे समजते. या आगीत २० ते २५ तंबू जळून खाक झाले.
प्रयागराज ( वास्तव पोस्ट ) : येथे सुरु असलेल्या महाकुंभ मेळा परिसरात भीषण आग लागली. यावेळी तात्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कॅम्पमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सविस्तर माहिती अशी की, आज रविवार दि.२० रोजी दुपारी ४ वाजुन ३० मिनिटांच्या सुमारास प्रयागराजच्या महा कुंभमेळ्यात अचानक आग लागल्यानंतर त्याठिकाणी एकच पळापळ झाली.
अग्नीशामक दलाच्या १५ गाड्यांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने सुमारे ३० ते ३५ मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमध्ये तेथील सामान जळून खाक झाले.
🔥सिलेंडरचा स्फोटामुळे लागली आग :
महाकुंभ टेंट सिटीमध्ये लागलेल्या या भीषण आगीत जवळजवळ २० ते २५ तंबू जळाल्याची माहिती आहे. स्वस्तिक गेटजवळ आणि आखाडे असलेल्या रेल्वे पुलाखाली आग लागली. अग्निशमन विभागाने ताबड़तोब सेक्टर १९ चा परिसर सील केला. या भागामध्ये दोन सिलिंडरलचा स्फोट झाला. त्यामुळे त्याठिकाणी असलेल्या तंबूंमध्ये आग पसरली अशी माहिती आखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी भास्कर मिश्रा यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, यात कोणीही जखमी झाले नसून आगीवर नियंत्रण मिळवल्याचे सांगण्यात आले.
